ATM Withdrawal Rules: 1 मेपासून एटीएममधून पैसे काढणे आणि बॅलन्स चेक करणे महागणार, RBIचे नवे नियम लागू

2 Min Read
Atm Withdrawal Charges Increase RBI New Rules

Atm Withdrawal Charges Increase RBI New Rules : १ मेपासून एटीएम व्यवहारांवर नवीन शुल्क लागू होणार असून, एटीएममधून रोख रक्कम काढणे आणि बॅलन्स चेक करणे यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एटीएम इंटरचेंज शुल्क वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे तुमच्या बँकेव्यतिरिक्त इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास किंवा बॅलन्स चेक केल्यास आता अधिक शुल्क आकारले जाणार आहे.

आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार, एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपयांपर्यंत वाढणार आहे, तर बॅलन्स चेक करण्याचे शुल्क ६ रुपयांवरून ७ रुपयांपर्यंत होणार आहे. मात्र, बँकांकडून ग्राहकांना ठराविक फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा दिली जाते. मेट्रो शहरांमध्ये पाच आणि बिगर मेट्रो शहरांमध्ये तीन विनामूल्य व्यवहार करता येतील. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी हे वाढीव शुल्क लागू होईल.

आरबीआयने ही शुल्कवाढ नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या प्रस्तावावर आधारित केली आहे. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या शुल्क दरांमुळे वाढता खर्च भागवणे कठीण होत असल्याचे या ऑपरेटरांनी सांगितले होते. या शुल्कवाढीचा सर्वाधिक फटका लहान बँकांना बसणार आहे, कारण त्यांचे स्वतःचे एटीएम नेटवर्क मर्यादित असल्याने त्यांना इतर बँकांच्या एटीएमवर अधिक अवलंबून राहावे लागते.

ग्राहकांना अनावश्यक शुल्क टाळायचे असल्यास, शक्यतो आपल्या बँकेच्या एटीएमचा वापर करावा किंवा डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

🔴 हेही वाचा 👉 सरकारचा कठोर निर्णय, 7.8 लाखहून अधिक सिम आणि 83,000 व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स ब्लॉक.

Share This Article