Ayushman Bharat Yojana Gig Workers Health Insurance : केंद्र सरकारने गिग आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता या वर्कर्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कव्हरेज मिळणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी याबाबत माहिती दिली असून, लवकरच या योजनेंतर्गत लाभ वाटप सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
गिग वर्कर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे
भारतामध्ये गिग आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर्कर्सची संख्या वेगाने वाढत आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार, 2024-25 पर्यंत या क्षेत्रात एक कोटीहून अधिक लोक कार्यरत असतील आणि 2029-30 पर्यंत हा आकडा 2.35 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. राइडशेअरिंग, फूड डिलिव्हरी, लॉजिस्टिक्स आणि अन्य डिजिटल सेवांमध्ये गिग वर्कर्सचा मोठा सहभाग आहे.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी आवश्यक
केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी विशेष सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर वर्कर्सना ओळखपत्र दिले जाईल आणि त्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आरोग्य विमा कव्हर मिळेल.
सरकारचा एक कोटी वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्याचा उद्देश
सरकारने एक कोटी गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी व्यापक आराखडा तयार केला आहे. उबर, ओला, स्विगी, जोमॅटो आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या वर्कर्सना याचा थेट लाभ होणार आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार, गिग वर्कर्स हे असे कर्मचारी असतात, जे पारंपरिक नोकरीच्या संकल्पनेत बसत नाहीत, परंतु विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपली उपजीविका कमावतात.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो गिग वर्कर्सच्या आरोग्य सुरक्षिततेला मोठा आधार मिळणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रात नवीन पीक विमा योजना; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा.