Ladki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशातील लाडली बेहना योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली. निवडणुकीपूर्वी अधिकाधिक महिलांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी अर्ज भरून घेण्यावर भर देण्यात आला. परिणामी, अनेक अर्ज तपासणी न करता मंजूर करण्यात आले आणि महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली. मात्र, निवडणुकीनंतर सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली असून, त्यातून अपात्र लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे.
Ladki Bahin Yojana Pune News : पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 लाख 11 हजार 991 अर्ज प्राप्त झाले होते. सरकारने योजनेच्या निकषानुसार अपात्र लाभार्थींनी स्वयंप्रेरणेने लाभ सोडावा, असे आवाहन केले होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अधिकृत पडताळणी सुरू करण्यात आली. विशेषतः ज्या लाभार्थींच्या नावावर चारचाकी वाहने आहेत किंवा ज्या महिलांनी अर्ज करताना चुकीची कागदपत्रे दिली आहेत, अशा प्रकरणांची तपासणी केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यात तब्बल 16,000 लाभार्थींचे आधार क्रमांक आणि अन्य कागदपत्रे अचूक जुळत नसल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळले आहे. त्यामुळे हे सर्व तपशील अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. योजनेसाठी अर्ज करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पडताळणी प्रक्रिया गावपातळीवर अंगणवाडी सेविकांच्या मदतीने केली जात असून, काही ठिकाणी पर्यवेक्षकांच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्यामुळे सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच योजनेच्या रक्कमेबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
🔴 हेही वाचा 👉 20व्या हप्त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला? जाणून घ्या महत्त्वाचे नियम.