Ladki Bahin Yojana Impact : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेसाठी समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. यामुळे या दोन्ही विभागांच्या अनेक योजनांवर मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता असून, संबंधित विभागांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
७ हजार कोटींचा निधी वळवला
मिळालेल्या माहितीनुसार, समाजकल्याण विभागाच्या ३ हजार कोटी आणि आदिवासी विभागाच्या ४ हजार कोटी रुपयांचा निधी अर्थविभागाने माझी लाडकी बहिण योजनेसाठी (MaziLadki Bahin Yojana) वळवला आहे. त्यामुळे समाजकल्याण आणि आदिवासी विभागाच्या अनेक योजनांवर परिणाम होणार आहे.
अर्थसंकल्पात ३६ हजार कोटींची तरतूद
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी राज्य सरकारने २०२५ च्या अर्थसंकल्पात ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे. हा निधी उभारण्यासाठी इतर विभागांच्या अनुदानात कपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
🔴 हेही वाचा 👉 अर्थसंकल्पात 2100 रुपयांचा उल्लेख नाही, सरकारच मत काय?.
दलित आणि आदिवासी महिलांना यातून लाभ
संविधानातील तरतुदींनुसार समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागांचा निधी इतरत्र वर्ग करता येत नाही. मात्र, या दोन्ही विभागांचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वापरण्यात आला असून, दलित आणि आदिवासी महिलांना याच रकमेतून लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे हा निधी वेगळा मंजूर केला पाहिजे, अशी संबंधित विभागांची भूमिका आहे.
अर्थमंत्र्यांच्या निर्णयावर टीका
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी यावर नाराजी व्यक्त करत सांगितले की, संविधानानुसार समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागांना निधी देणे बंधनकारक आहे. मात्र, या विभागांचा निधी वळवला गेला आहे. अर्थसंकल्पात यावर सरकार काय उत्तर देते याकडे लक्ष असेल, तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहिण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वळवल्याने समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या मनमानी कारभारावर संबंधित विभागांनी आक्षेप घेतला आहे.
🔴 हेही वाचा 👉 १२ मार्चपर्यंत हप्ता जमा करण्याचे आश्वासन, तरीही अनेक महिलांच्या खात्यात पैसे नाहीत!.