Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या निधीत १०,००० कोटी रुपयांची कपात करण्यात आली असून, ही योजना बंद केली जाणार नाही, तर योजनेत काही आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान, विधानसभेत बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोणतीही योजना सुरू केल्यानंतर कालानुसार त्यात बदल करणे आवश्यक असतात. तसेच, निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता पाच वर्षांच्या कालावधीत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत होणारे संभाव्य बदल:
- योजना बंद होणार नाही, परंतु सुधारणा करण्यात येणार.
- निधी ₹४६,००० कोटींवरून ₹३६,००० कोटींवर कमी.
- ₹२१०० अनुदान कधी लागू होईल, याबाबत अद्याप निश्चित निर्णय नाही.
- महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे मुख्य उद्दिष्ट कायम राहील.
- महिला बचत गटांसाठी विशेष कर्ज योजना प्रस्तावित.
लाडकी बहीण योजनेच्या सुधारित अटी व पात्रता निकष:
- वय: २१ ते ६५ वर्षे.
- वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे.
- अपात्रता:
– कुटुंबातील कोणीही इनकम टॅक्स भरत असल्यास किंवा शासकीय नोकरीत/निवृत्तीवेतनधारक असल्यास.
– अन्य शासकीय वित्तीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिला पात्र नाहीत.
– चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यापूर्वी विधानसभेत माहिती दिली होती की, ऑक्टोबर २०२४ मध्ये २.३३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता, तर जानेवारी २०२५ मध्ये हा आकडा २.४७ कोटींवर पोहोचला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेअंतर्गत होणाऱ्या सुधारणा आवश्यक असल्याचे सांगत, सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.