SBI Yono App Update Android 11 Support Ended : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, कोट्यवधी नागरिकांचे खाते या बँकेत आहेत. पेन्शनधारकांपासून तरुण ग्राहकांपर्यंत अनेक लोक SBI YONO अॅपचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करतात. मात्र, बँकेच्या नव्या निर्णयामुळे अनेक ग्राहक अडचणीत आले आहेत.
एसबीआयने सुरक्षा वाढवण्याच्या कारणास्तव जुने स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. Android 11 किंवा त्याहून जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर YONO अॅपची सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना बँकेच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल अपग्रेड करावा लागणार आहे.
बँकेने आपल्या ग्राहकांना 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मोबाईल अपडेट करण्यास सांगितले होते. मात्र, 1 मार्च 2025 पासून Android 11 किंवा त्यापेक्षा जुन्या आवृत्तीच्या फोनवर SBI YONO सेवा बंद झाली आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील ग्राहक यामुळे सर्वाधिक त्रस्त आहेत.
एसबीआयच्या या निर्णयावर अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ एका अॅपसाठी नवीन मोबाईल खरेदी करावा लागणे हे त्रासदायक असल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. बँकेच्या ऑनलाइन सेवा वापरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय अधिक त्रासदायक ठरत आहे.
सध्या भारतात सायबर सुरक्षेच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने एसबीआयने हा निर्णय घेतला असला, तरी यामुळे लाखो ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. योनो अॅपचा (SBI Yono App) वापर सुरू ठेवायचा असेल, तर ग्राहकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, निवडणुकीत दिलेलं आश्वासन कस पूर्ण होणार?.